बेळगाव (प्रतिनिधी) : रेल्वे राज्यमंत्री आणि बेळगावचे खासदार सुरेश अंगडी (वय ६५) यांचे कोरोनामुळे आज (बुधवार) निधन झाले. त्यांच्यावर दिल्लीतल्या एम्समध्ये रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अंगडी यांना ११ सप्टेंबरला कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले. त्यांनी स्वत: ट्विट करून त्याची माहिती दिली होती.

सुरेश अंगडी हे बेळगावमधील सदाशिव नगरमध्ये ते राहत होते. गेले १२ दिवसांपासून त्याच्यावर कोरोनाचे उपचार सुरू होते. दोन दिवसांपूर्वी त्यांना जास्त त्रास होत असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले होते. त्यांना पाहिल्यादाच मंत्रीपद मिळालं होतं. सुरेश आंगडी यांचा बेळगाव मतदारसंघ होता. २००४ साली पहिल्यांदा लोकसभा लढवत ते विजयी झाले. त्यानंतर २००९, २०१४ आणि २०१९ सलग चौथ्यांदा विजयी झाले. तर पंतप्रधान मोदी यांचे विश्वासू मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. २०१९ च्या सरकारमध्ये रेल्वे राज्यमंत्री पद मिळाले. त्यांनी रेल्वे डिजिटलायजेशनवर भर दिला. तसेच रेल्वेच्या स्वच्छतेवर विशेष भर दिला होता.

दरम्यान, सुरेश अंगडी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करून त्यांच्या कुटुंबीयाबद्दल संवेदना व्यक्त केली आहे.