विद्यापीठ हायस्कूलच्या १९९३ बॅचकडून १० हजार शेणी दान

कोल्हापूर (प्रतिनिधी) : विद्यापीठ हायस्कूलच्या १९९३च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंचगंगा स्मशानभूमीस अंत्यसंस्कारासाठी आज (मंगळवार) १० हजार शेणी उपमहापौर संजय मोहिते यांच्या उपस्थितीत दान केल्या.

यावेळी नगरसेवक तौफिक मुल्लाणी, चेतन चव्हाण,  सुमंत कुलकर्णी, महेश पाटील, अमर माने, विश्वनाथ तेली, शरद कोथळकर, आरोग्य निरिक्षक अरविंद कांबळे, कर्मचारी वर्ग उपस्थित होते. यापूर्वी २० हजार आणि आज १० हजार अशा एकूण ३० हजार शेणी या बॅचने पंचगंगा स्मशानभूमीस दिल्या असल्याचे नगरसेवक तौफिक मुल्लाणी यांनी सांगितले. आज दिलेल्या या १० हजार शेणी कसबा बावडा स्मशानभूमीसाठी रवाना करण्यात आल्या आहेत.

घोडके परिवाराकडून १० हजार शेणी दान

कै. बाबुराव रामा घोडके (बेडकिहाळकर माका) यांच्या स्मरणार्थ त्यांचे पुत्र नितिन घोडके आणि अजित घोडके यांनी पंचगंगा  स्मशानभूमीस १० हजार शेणी महापौर निलोफर आजरेकर यांच्या उपस्थितीत दान केल्या.

पंचगंगा स्मशानभूमीसाठी समाजातील दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी मदत तसेच शेणीदान करण्याचे आवाहन महापौर निलोफर आजरेकर आणि महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले होते.  महापौर यांच्या या आवाहनाला कोल्हापूरकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यापुढील काळातही दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी पंचगंगा स्मशानभूमीसाठी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन महापौर यांनी यावेळी केले.

यावेळी महापालिकेचे जलअभियंता राजेंद्र हुजरे, शितल प्रभावळकर, राजवर्धन मोरे, अनिल कांबळे आदी उपस्थित होते.

पंचगंगा नागरी सहकारी बँकेच्यावतीने ११ हजार शेणी दान

पंचगंगा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष राजाराम शिपुगडे यांनी बँकेच्यावतीने पंचगंगा स्मशानभूमीस ११ हजार शेणी महापालिकेचे आरोग्य निरिक्षक अरविंद कांबळे यांच्याकडे सुपूर्द केल्या.

यावेळी चेअरमन राजाराम शिपुगडे यांच्यासह उपाध्यक्ष राहुल भोसले, संचालक संदिप पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक फडणीस, सरव्यवस्थापक सुशिल कुलकर्णी, मार्केटींग मॅनेजर दिपक गाणू आणि सुभाष बोधे आदी उपस्थित होते.