हातकणंगले (प्रतिनिधी) : मराठा समाजाला ५८ क्रांती मोर्चे आणि अनेक आंदोलनानंतर तत्कालीन महाराष्ट्र सरकारने आरक्षण दिले. मात्र, या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. राज्य सरकारने ताबडतोब ठोस भूमिका जाहीर करावी. विद्यार्थ्यांचे व समाजाचे नुकसान थांबवावे या मागणीसाठी हातकणंगले तालुका सकल मराठा समाज समन्वय समितीच्या वतीने हातकणंगले येथे एसटी स्टँडजवळ कोल्हापूर-सांगली मार्गावर आज (सोमवार) तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निदर्शने करण्यात आली. शिवाय सरकारने दुर्लक्ष केल्यास आंदोलनाची तीव्रता टप्प्याटप्प्याने वाढविण्याचा इशारा देण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाचा न्यायालयाच्या स्थगिती आदेशामुळे राज्यभरातील मराठा सकल मराठा समाजामध्ये संतापाची लाट उमटून आंदोलने सुरू झाली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज सकाळी अकरा वाजता रास्ता रोको करण्यात आला. यामुळे कोल्हापूर, सांगली, पेठवडगाव मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.

यावेळी हातकणंगले तालुका सकल मराठा समाजाच समन्वय समितीचे अध्यक्ष प्रा.रवींद्र पाटील, उपाध्यक्ष दीपक कुन्नुरे,  सचिव भाऊसाहेब फास्के, ॲड. संग्रामसिंह निंबाळकर, हणमंत पाटील, वनिता खोपकर, वैष्णवी चव्हाण, प्रवीण केर्ले, शिवाजीराव माने, अमित गर्जे, शिवाजी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट न पाहता मराठा समाजातील विद्यार्थ्यास चालू शैक्षणिक वर्षांमध्ये शालेय फीची तरतूद ताबडतोब करावी, त्याचबरोबर आरक्षणाबाबत बाजू मांडण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात तज्ज्ञ वकिलांची नेमणूक करावी, सारथी संस्थेला आर्थिक पाठबळ द्यावे. तसेच सत्तेत बसलेल्या आणि विरोधात असलेल्या सर्वच मराठा समाजाच्या लोकप्रतिनिधींनी याप्रश्नी ठोस भूमिका घेण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

यावेळी पं. स. माजी उपसभापती दीपक वाडकर, अजिंक्य इंगवले, नगरसेवक राजू इंगवले, दिनानाथ मोरे,अभिजित लुगडे,पंडित निंबाळकर,माजी उपसरपंच चंद्रकांत जाधव,उमेश सुर्यवंशी,कृष्णात जाधव,सुनील काटकर सुभाष चव्हाण, राजू वाडकर, नारायण बिरंजे, भारत नलवडे, प्रदीप कदम, गजानन खोत, दिलीप खोत आदींसह तालुक्यातील अनेक गावातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान रास्ता रोको आंदोलनानंतर हातकणंगलेचे तहसीलदार डॉ.प्रदीप उबाळे यांना मराठा आरक्षणाबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर काळे,प्रवीण गिल्डा पोलीस निरीक्षक अशोक भवड उपस्थित होते. यावेळी पोलीस बंदोबस्त मोठा ठेवण्यात आला होता.